उरण दि १४(विठ्ठल ममताबादे )विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून सातत्याने नाविन्यपूर्ण, कृतीआधारित व विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या शर्मिला महेंद्र गावंड यांना रायगड जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ चा ‘शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची जिल्हास्तरावर झालेली ही दखल शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार, रायगडच्या पावन भूमीत सह्याद्रीच्या साक्षीने महाड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारक पवित्र वास्तूमध्ये जिल्ह्यातील असंख्य मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.पालकमंत्री भरत शेठ गोगावले , विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील , जिल्हा शिक्षण सभापती कळंबे , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. नेहा भोसले मॅडम, जिल्हा परिषदेचे सर्व समित्यांचे सभापती , जिल्हा परिषद सदस्य, शिक्षणाधिकारी, सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवीन शेवे, ता. उरण, जि. रायगड येथे कार्यरत असलेल्या गावंड यांनी पारंपरिक अध्यापन पद्धतीला नाविन्याची जोड देत विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पाठांतर न करता कृतीतून शिकावे, प्रयोगातून संकल्पना समजून घ्याव्यात आणि स्वतः विचार करून शिकण्याची सवय लागावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
त्यांच्या या कार्याची दखल घेत गेल्या तीन वर्षांत त्यांना विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांकडून २५ हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. स्थानिक पातळीपासून तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरापर्यंत त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांची दखल घेतली गेली आहे.
युट्युबच्या माध्यमातून ज्ञानाची व्यापक पोहोच :-
सध्याच्या डिजिटल युगाची गरज ओळखून गावंड यांनी युट्युबच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम, कृती, अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शैक्षणिक माहिती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिली. त्यांच्या या डिजिटल उपक्रमांचा लाभ त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसह अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनाही होत आहे.
DIET पनवेलच्या माध्यमातून राज्यस्तरापर्यंत मजल :-
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), पनवेल यांच्या विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना प्रभावीपणे मांडल्या. विविध उपक्रम, शैक्षणिक साहित्यनिर्मिती आणि कृतीआधारित अध्यापनाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला राज्यस्तरापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली.
विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक साहित्यनिर्मिती, तंत्रज्ञानाचा वापर, कृतीआधारित अध्यापन, प्रयोगशीलता, अवांतर वाचन, सर्जनशीलता आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
“शिक्षकाचे खरे यश हे पुरस्कारांमध्ये नसून विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये असते,” या विचाराने प्रेरित होऊन त्या सातत्याने कार्यरत आहेत. मिळालेले पुरस्कार हे त्यांच्या कार्याचा शेवट नसून अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा असल्याचे त्यांचे मत आहे.
तीन वर्षांत २५ हून अधिक पुरस्कार, डिजिटल माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले शैक्षणिक कार्य आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना मिळालेली राज्यस्तरीय दखल या सर्वांचा गौरव म्हणून ‘शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’ त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील आणखी एक मानाचा टप्पा ठरला आहे.
शर्मिला महेंद्र गावंड यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील सहकारी, विद्यार्थी, पालक, विविध शैक्षणिक संस्था आणि हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Back to top button
