लातूर :(प्रतिनिधी ):…..
जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे शिऊर येथील शासकीय गायरान जमिनीवरील पाझर तलाव प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या व्यक्तीवर पाझर तलाव बुजवून अतिक्रमण केल्याचा आरोप आहे, त्याच व्यक्तीला चौकशी अहवालात साक्षीदार बनवण्यात आले, त्यामुळे संपूर्ण चौकशी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मौजे शिऊर येथील सर्वे नं. 1 मधील सुमारे ३ एकर क्षेत्रफळाचा पाझर तलाव व त्यास लागून असलेली ५ ते ६ एकर गायरान जमीन ही गावातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा पाणीस्त्रोत आहे. या तलावामुळे शेती, जनावरांचे पाणी आणि भूजल पातळी टिकून राहते. मात्र, शिऊरचे दाजी यांनी हजारो ब्रास खडक व मुरूम विनारॉयल्टी काढून तोच मुरूम तलावात टाकत पाझर तलाव बेकायदेशीररीत्या बुजवून त्या ठिकाणी गुळ उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.
*आरोपीच चौकशीचा साक्षीदार!*
या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर लघु पाटबंधारे विभागाने चौकशी केली. मात्र, चौकशीदरम्यान धक्कादायक प्रकार घडला. कनिष्ठ अभियंता ए.बी. पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्याचा अहवाल दिला; पण ज्यांच्याविरुद्ध तक्रार आहे त्या दाजीनाच चौकशीचा साक्षीदार बनवण्यात आले. शिऊर गावाची लोकसंख्या तीन ते पाच हजार असताना इतर कोणत्याही गावकऱ्याची साक्ष न घेता थेट आरोपीचीच साक्ष घेण्यात आल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
अहवालातच मोठा विरोधाभास
या चौकशी अहवालात गंभीर विसंगतीही दिसून येते. कनिष्ठ अभियंता म्हणतात की तिथे मुरूम दिसून आले नाही पण साक्षीदार असलेले दाजी म्हणतात की वळसांगवी ग्रामपंचायतीने रस्त्यासाठी मुरूम टाकला आहे मग खरे कोण बोलत आहे? अधिकारी की साक्षीदार?, हा विरोधाभास संपूर्ण चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
कार्यकारी अभियंत्यांचा “उडवा-उडवीचा” अहवाल
उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे निलंगा यांनी दिलेल्या अहवालावरून कार्यकारी अभियंता बी.आर. शेलार जिल्हा परिषद लातूर यांनी 6 मार्च 2026 रोजी दिलेल्या अहवालात म्हटले आहे की शिऊर येथील पाझर तलाव लघु पाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखाली येत नाही.
परंतु नियमांनुसार ० ते १०० हेक्टर क्षेत्रफळातील तलाव हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे असतात, तसेच जुन्या शिवकालीन तलावांची जबाबदारीही जिल्हा परिषदेकडे असते. असे असताना हा तलाव आमच्या अखत्यारीत येत नाही असे सांगत अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
*“हा तलाव नेमका कोणाच्या ताब्यात?”*
या प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लघु पाटबंधारे विभाग म्हणतो तलाव आमचा नाही, जलसंधारण विभाग म्हणतो आमचा नाही, जलसंपदा विभाग म्हणतो आमचा नाही, महसूल विभागही जबाबदारी नाकारतो मग शिऊर गावातील हा पाझर तलाव नेमका कोणत्या विभागाच्या अखत्यारीत येतो? असा प्रश्न आता गावकऱ्यांना पडला आहे.
*आर्थिक संगनमताचा घात*
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार कनिष्ठ अभियंता ए.बी. पाटील, उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंता बी.आर. शेलार यांनी दाजी यांच्याशी संगनमत करून आर्थिक देवाणघेवाणीतून खोटा अहवाल दिला आणि तलाव बुजवण्याच्या प्रकाराला अभय दिले.
*गुन्हा दाखल करण्याची मागणी”
या प्रकरणात पाझर तलाव बुजवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, खोटा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, बुजविलेला तलाव पूर्ववत करून शेतकरी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
६ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा..
जर कारवाई झाली नाही तर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने ६ एप्रिल २०२६ पासून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिला आहे.