गेवराई | विष्णु राठोड..
दिव्यांग पत्रकाराला बँकेत केवायसीसाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात दिव्यांग हक्क अधिनियम 2016 अंतर्गत कलम 92 नुसार बँक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार नवनाथ आडे हे साप्ताहिक बीड सिटी लाईफ व दैनिक महाराष्ट्र आरंभ येथे उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. नवनाथ आडे हे 68 टक्के पायाने दिव्यांग असल्याने त्यांना जास्त वेळ उभे राहणे शक्य नाही. दरम्यान, दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी ते आपल्या बचत खात्याचे केवायसी करण्यासाठी भारतीय स्टेट बँक, उमापूर शाखेत गेले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत मदतीसाठी त्यांचे भाऊ अभय आडे व रोहित बआडे हे देखील होते.
बँकेत केवायसी फॉर्म भरल्यानंतर नवनाथ आडे हे प्रथम कॅशिअरकडे गेले असता त्यांनी त्यांना शाखा व्यवस्थापकांकडे जाण्यास सांगितले. त्यानुसार ते व्यवस्थापकांच्या केबिनमध्ये गेले असता, व्यवस्थापकांनी त्यांच्यासोबत आलेल्या भावांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी नवनाथ आडे यांनी आपण दिव्यांग असल्याचे सांगितले तरीही व्यवस्थापकांनी त्याकडे दुर्लक्ष करत त्यांना नीट उभे राहा, शिस्त कळत नाही का? असे म्हणत अवमानकारक वागणूक दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानंतर व्यवस्थापकांनी त्यांना पुन्हा कॅशिअरकडे पाठवले, तर कॅशिअरने परत व्यवस्थापकांकडे जाण्यास सांगितल्याने दिव्यांग पत्रकाराला एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फिरवण्यात आले. त्यामुळे त्यांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
इतकेच नव्हे तर, बँकेच्या केबिनबाहेर येऊन सर्व ग्राहकांसमोर तुझ्यासारखे हजार पत्रकार आणि अपंग येतात असे म्हणत आपला सार्वजनिक अपमान करण्यात आल्याचा गंभीर आरोपही फिर्यादी नवनाथ आडे यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नवनाथ आडे यांनी अखेर चकलांबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत चकलांबा पोलिसांनी दिव्यांग हक्क अधिनियम 2016 अंतर्गत कलम 92 नुसार संबंधित बँक व्यवस्थापकाविरुद्ध दि. 06 मार्च 2026 रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. दिव्यांग व्यक्तीचा अपमान करणे, त्यांना सेवा देताना भेदभाव करणे किंवा त्रास देणे हा कायद्याने गुन्हा असून संबंधितांवर कठोर कारवाईची तरतूद आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने वागणूक मिळावी, तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास चकलांबा पोलीस करत आहेत.
#चौकट-
दिव्यांगांच्या हक्कांसाठी पोलिसांची ठाम भूमिका
चकलांबा पोलीस ठाण्याचे एपीआय संदीप पाटील यांनी दिव्यांग पत्रकाराच्या तक्रारीची गंभीर दखल घेत तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यांच्या कार्यकाळात दिव्यांग हक्क अधिनियमांतर्गत हा पहिलाच गुन्हा नोंदवण्यात आल्यामुळे या कारवाईकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने वागणूक देणे ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी असून त्यांचे हक्क अबाधित राहावेत, यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
#चौकट-
न्याय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला : पत्रकार नवनाथ आडे
घटनेनंतर न्याय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. बँकेत झालेला अपमान हा केवळ वैयक्तिक नसून सर्व दिव्यांगांच्या स्वाभिमानाचा प्रश्न होता. त्यामुळे हा मुद्दा सातत्याने पाठपुरावा करत लढा दिला. विशेष म्हणजे हे प्रकरण थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंतही पोहोचले होते. अखेर पोलिसांनी दिव्यांग हक्क अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केल्याने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करत, दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा!
Back to top button
